मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Porsche case : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील मृत तरुणांच्या पालकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी १० लाखाचा चेक

Pune Porsche case : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील मृत तरुणांच्या पालकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी १० लाखाचा चेक

Jun 25, 2024 07:40 PM IST

पुण्यात १९ मे रोजी एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत भरधाव कार चालवून दोन बाइकस्वार तरुणांचा बळी घेतला होता. या प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला दोन्ही तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले.

पुणे पोर्शे कार अपघातातील मृत तरुणांच्या पालकांना राज्य सरकारकडून १० लाखाचा चेक सुपूर्द
पुणे पोर्शे कार अपघातातील मृत तरुणांच्या पालकांना राज्य सरकारकडून १० लाखाचा चेक सुपूर्द

पुणे शहरात १९ मे रोजी एका बिल्डरच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत तर्र होऊन भरधाव पोर्शे कार चाल���ून दोन बाइकस्वार तरुणांचा बळी घेतला होता. या घटनेमध्ये मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी असलेले आणि पुण्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणारा तरुण अनिश अवधिया (वय २४) आणि तरुणी अश्विनी कोश्टा (वय २४) या दोघांचा मृत्यू झाला होता. या हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला दोन्ही तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून आज राज्य सरकारकडून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात आले. या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या तरुणांच्या पालकांना सुपूर्द केला.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला आज, मंगळवारी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना जामीन मिळाला असला तरीही दोषींवर कारवाई करणारच असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

पुण्यातील पोरशे हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी काल, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करू तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं सांगितलं होतं. तसेच मध्य प्रदेशचे रहिवाशी असूनही त्यांना झालेल्या वैयक्तिक नुकसान पाहता सहवेदना व्यक्त करण्यासाठी त्याना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत म्हणून देण्याचे जाहीर केले होते. आज, मंगळवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मदतीचे धनादेश त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.

यावेळी या दोन्ही मुलांच्या पालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. तसेच आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण नव्याने हाती घेत सर्व दोषींवर कारवाई केल्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचेही आभार मानले. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पीडित कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४