मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जिम ट्रेनरशी पत्नीचं जुळलं सूत; दोघांनी मिळून पतीला संपवलं; तब्बल तीन वर्षांनंतर झाला पतीच्या हत्येचा खुलासा

जिम ट्रेनरशी पत्नीचं जुळलं सूत; दोघांनी मिळून पतीला संपवलं; तब्बल तीन वर्षांनंतर झाला पतीच्या हत्येचा खुलासा

Jun 19, 2024 07:38 AM IST

vinod bharara murder case : हरियाणाच्या पानिपतमधील महिलेने आपल्या जीम ट्रेनर प्रियकराबरोबर कट रचून पतीचा खून केला. ही घटना २०२१ साली घडली. तब्बल ३ वर्षानंतर तिने केलेल्या खुनाला वाचा फुटली आहे.

जिम ट्रेनरशी पत्नीचं जुळलं सूत; दोघांनी मिळून पतीला संपवलं; तब्बल तीन वर्षांनंतर झाला पतीच्या हत्येचा खुलासा
जिम ट्रेनरशी पत्नीचं जुळलं सूत; दोघांनी मिळून पतीला संपवलं; तब्बल तीन वर्षांनंतर झाला पतीच्या हत्येचा खुलासा

vinod bharara murder case : हरियाणाच्या पानिपतमध्ये तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१ साली झालेल्या एका हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराबरोबर कट रचून पतीचा खून केला. विनोद बरडा असे खून झालेल्या पतीचे नाव असून त्याचा ५ ऑक्टोबर २०२१ रोजी अपघात झाला होता. या अपघातामधून विनोद बरडा बचवला होता. पण त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाल्याच्या दोन महिन्यांनी ५ डिसेंबर २०२१ रोजी त्यांची पानिपतमधील घरात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, विनोद बरडा यांच्या हत्येला तीन वर्षानंतर वाचा फुटली आहे. पोलिसांनी या प्रकारचा सुरू केलेल्या फेरतपास विनोद बरडा यांची पत्नी निधी आणि तिचा प्रियकर सुमीतने कट रचून विनोदचा खून केल्याचे तपसात उघड झाले आहे. त्यांनी विनोदला दोन वेळा मारण्याचा कट रचला. मात्र, विनोद हा बचवला होता. मात्र, दुसऱ्या वेळेला तो वाचू शकला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

हरियाणातील पानिपतमध्ये एका व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या तीन वर्षांनंतर एक मोठा खुलासा समोर आला आहे. एक व्हॉट्सॲप मेसेज आणि पोलीस अधिकाऱ्याची करडी नजर यामुळे या हत्येमागील रहस्य उलगडले आहे. या हत्येमागची व्यक्ती दुसरी कोणी नसून मृत व्यावसायिकाची पत्नी होती, जिचा तिच्या जीम ट्रेनरवर जीव जडला होता. मात्र, त्यांच्या मार्गात विनोद अडथळा ठरत होता. यामुळे तिने प्रियकराच्या मदतीने हा संपूर्ण कट रचला. हा खुनाचा प्रकार तीन वर्षांनी उघड झाला आहे.

२०२१ मध्ये विनोद बरडा यांची हत्या झाली होती

डिसेंबर २०२१ मध्ये विनोदचा खून करण्यात आल्यावर या प्रकरणी विनोदच्या काकांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या नंतर ऑक्टोबरमध्ये देव सुनार नावाच्या वाहन चालकामुळे विनोदचा अपघात झाला होता. असे तपासात पुढे आले. तसेच देव सुनारवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याकडून हे प्रकरण मिटविण्यासाठी विनोदवर दबाव टाकण्यात येत असल्याची माहिती तसेच विनोदला धमक्या दिल्या जात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, १५ डिसेंबर २०२१ रोजी देव सुनारने विनोदच्या पानिपत येथील घरी जात घराचे दरवाजे आतून बंद करत विनोद याच्यावर गोळीबार करत त्याची हत्या केली. देव सुनार हा ट्रक चालक होता. याआधीही त्यांनी विनोद भरारा यांना ट्रकने मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यात विनोद गंभीर जखमी झाला होता. अटकेवेळी देव सुनार याने पोलिसांना सांगितले होते की, ट्रक अपघात प्रकरणात कोर्टाबाहेर तोडगा काढण्यास नकार दिल्याने आपण विनोदचा खून केला. देव सुनार हा तुरुंगात होता व हा खटला रखडला होता. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

पोलिसांना व्हॉट्सॲप मेसेज सापडला

पोलिस या प्रकारचा तपास करत असतांना जिल्हा पोलीस प्रमुख व आयपीएस अधिकारी अजितसिंह शेखावत यांच्या फोनवर व्हॉट्सॲप मेसेज आला. मेसेजमध्ये विनोदच्या ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या प्रमोद या भावाने या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलीस अधिकाऱ्याला या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती. विनोद भरारा यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर या गुन्हाचा पुन्हा फेरतापास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी या प्रकरणात काही तरी काळेबेरे असल्याचे लक्षात आले. पुन्हा या प्रकरणाचा तपास करतांना पोलिसांना आढळले की, अपघात प्रकरणी गुन्हात होणारी शिक्षा ही कमी असते. हा गुन्हा मागे घेण्यासाठी कुणी कुणाचा खून का करेल?

किलरचे जिम ट्रेनरशी जवळचे संबंध असल्याचे निष्पन्न

यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याने हरियाणा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण संस्थेचे दीपक कुमार यांना या प्रकरणाचा नव्याने तपास करण्यास सांगितला. पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला. तेव्हा देव सुनार हा जिम ट्रेनर सुमितच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यांचे फोन कॉल देखील ट्रेस करण्यात आले. हा जीम ट्रेनर विनोद बरडा याची पत्नी निधीला चांगला ओळखत होता. पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवून चौकशी केली. हळूहळू या मर्डर मिस्ट्रीचे कोडे सुटू लागले.

निधीचे जीम ट्रेनर सुमितशी जुळले सूत

विनोद बरडा यांची पत्नी निधी बरडा हिचे आणि सुमितचे प्रेम प्रकरण सुरू होते, निधी ही सुमीतला जीममध्ये भेटली. येथे दोघांमध्ये जवळीक वाढली व त्यांचे अफेअर सुरू झाले. विनोदला या प्रकरणाची कुणकुण लागली. यावरुन त्याचे पत्नी निधीशी भांडण झाले. तसेच त्यांच्यात वाद देखील वाढू लागले होते. विनोदने जिम ट्रेनर सुमितशीही भांडण केले व त्याला पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले. या भांडणांनंतर निधी व सुमितने विनोदच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१० लाख रुपये रोख देण्याची ऑफर

चौकशीदरम्यान जिम ट्रेनर सुमितने पोलिसांना सांगितले की, या कामासाठी त्याने पंजाबमधील ट्रकचालक देव सुनार याच्याशी संपर्क साधला होता. ट्रक चालकाला १० लाख रुपये रोख देऊ करण्यात आले. त्याने मान्य केले. त्यानंतर पिकअप व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आणि ५ जानेवारी २०२१ रोजी देव सुनार यांनी या वाहनाने विनोदच्या कारला धडक दिली. यात विनोद गंभीर जखमी झाला, मात्र बचावला. यानंतर निधी आणि सुमितने प्लॅन बी तयार केला.

देव सुनारने विनोदच्या घरी जाऊन अपघात प्रकरण निकाली काढण्यास सांगितले. मात्र, त्याने नकार दिला. यामुळे देव सुनारने विनोदवर गोळी झाडून त्याची हत्या केली. विनोदच्या हत्येनंतर काही दिवसांनी सुमित आणि निधी मनालीला गेल्याचेही तपासात समोर आले आहे. बातम्यांनुसार, तिने आपल्या मुलांना ऑस्ट्रेलियात त्यांच्या काकांकडे राहण्यासाठी पाठवले.

या प्रकरणातील दुवे जोडून पोलिसांनी निधी आणि सुमितला ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघांनीही गुन्हा कबूल केला. देव सुनार यांचा कायदेशीर आणि घरगुती खर्च निधी स्वत: उचलत असल्याचेही समोर आले आहे. निधी पती विनोद यांच्या निधनानंतर विमा कंपनीकडून मिळालेल्या पैशातून हा खर्च भागवत होती. निधी आणि सुमितची हत्येतील भूमिका स्पष्ट झाल्यानंतर दोघांनाही अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. ते आता तुरुंगात आहे.

WhatsApp channel
विभाग